पुणे : विना हेल्मेट दुचाकीस्वार व सह प्रवासी यांचे अपघात व त्यात मृत्युमुखी तसेच जखमी होणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विना हेल्मेट दुचाकीस्वार व पाठीमागे बसलेल्या दोघांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक विभागाचे अपर पोलिस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलिस आयुक्त व पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीनंतर त्वरित हा आदेश काढण्यात आला आहे. त्यामुळे दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याविषयी रोष व्यक्त केला जात आहे. आत्तापर्यंत केवळ विना हेल्मेट असलेल्या दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात येत होती.आता मात्र सहप्रवाशावर देखील करवाई केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक पोलिसांच्या ई-चलन मशिनमध्ये बदल करण्यात आला आहे.
केवळ सहप्रवाशावर कारवाई करण्याची तरतूद त्यात करण्यात आल्याचे महासंचालकांनी काढलेल्या पत्रात नमूद आहे. सध्या विनाहेल्मेट वाहनचालकांवर सीसीटीव्हीमार्फत देखील कारवाई केली जात आहे.पुणे शहरात दररोज अशा प्रकारे सुमारे चार हजार चालकांवर कारवाई केली जाते.मात्र त्यातून दंड भरणाऱ्यांची संख्या कमी आहे.
हेल्मेटविना दुचाकी चालविल्याप्रकरणी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने पुण्यातील सुमारे १० हजार वाहनचालकांवर कारवाई केली. यातून ४४ लाख ५७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाने १ एप्रिल ते ३१ ऑक्टोबर २०२४ दरम्यान केली. गेल्या काही दिवसांपासून सरकारी कार्यालयांत दुचाकीवर येणाऱ्यांना हेल्मेट अनिवार्य केले आहे.
पुणे ‘आरटीओ’च्या वायुवेग पथकाने ऑक्टोबरमध्ये ४ हजार १६५ वाहनांची तपासणी केली.पैकी २ हजार १७५ दुचाकीचालकांनी हेल्मेट घातले नसल्याने त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.यातून सुमारे १० लाख २९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला. हेल्मेट नसेल तर ५०० रुपयांचा दंड आहे. विभागीय आयुक्त यांनी आदेश दिल्यानंतर ‘आरटीओ’ प्रशासनाने हेल्मेट न घालता दुचाकीने सरकारी कार्यालयांत येणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.
Related Posts
Add A Comment