खेड [रूपाली भाटिया] : लोटे परशुराम औद्योगिक वसाहत कायमच अपघात, आगीच्या घटना आणि प्रदूषण यासारख्या विषयांसाठी चर्चेत राहिली आहे. अशातच आज शनिवार दिनांक २६ रोजी याच औद्योगिक वसाहती मधील विनती ऑरगॅनिक लिमिटेड या रासायनिक कारखान्यामध्ये बॉयलर च्या एयर प्री हीटर मधील दाब वाढल्याने स्फोट होऊन तेथे काम करीत असलेला समीर कृष्णा खेडेकर, अंदाजे वय ४०, राहणार घाणेखुंट हा कामगार गंभीर जखमी झाला. कारखाना व्यवस्थापनाने तातडीने त्याला चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात हलविले. मात्र तेथील वैद्यकीय सूत्रांनी त्याला उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले. या अपघातात मृत्युमुखी पडलेला समीर खेडेकर हा युवक कारखान्यामध्ये कायमस्वरूपी कामगार होता. गेली दहा वर्षे कारखान्यात तो कार्यरत होता. समीर हा घाणेखुंट गावचा रहिवासी असून रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्री सुरेश कांबळे यांचा जावई होता.या दुर्दैवी घटनेमुळे घाणेखुंट गावासह पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे. घटनेचे वृत्त समजताच पोलीस प्रशासन तातडीने कारखान्यामध्ये हजर राहून झालेल्या घटनेबाबत चौकशी केली. याबाबत कारखाना व्यवस्थापनाकडे चौकशी केली असता, घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून या अपघाताचे पृथक्करण केले जाईल आणि भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जाईल असे सांगितले. मृत कामगाराच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
औद्योगिक वसाहतीत वारंवार होणारे अपघात हे चिंतेचे कारण बनले असून संबंधित यंत्रणांनी अशा अपघातांची सखोल चौकशी करून दोषी कारखाणदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पंचक्रोशीतुन जोर धरू लागली आहे. एकीकडे औद्योगिक वसाहती मधील उद्योग भवन येथे खासदार सुनील तटकरे यांनी सर्व उद्योजक, एमआयडीसीचे अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांचे सोबत औद्योगिक वसाहती मधील वाढते अपघात, प्रदूषण आणि स्थानिकांच्या रोजगाराच्या प्रश्नांवर आढावा बैठक घेतली होती. एकीकडे ही बैठक चालू होती त्याच दरम्यान विनती ऑरगॅनिक मध्ये स्फोट होऊन एक कामगार मृत्युमुखी पडला. मग लोकप्रतिनिधींनी बैठका घेऊन कारखानदारांना आणि संबंधित यंत्रणांना केलेल्या सूचनांचे पालन होऊन भविष्यात कामगारांचे नाहक जाणारे जीव वाचतील का? असा प्रश्न पंचक्रोशीला पडला आहे.

