मुंबई (शेखर म्हात्रे ) : कोळी वादळ बृहन्मुंबई महानगर पालिकेवर धडकणार, क्रॉफर्ड मार्केट येथील छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई स्थलांतराच्या विरोधात मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी सी.एस.टी येथील पालिका मुख्यालयावर निघणार मच्छिमार जन आक्रोश मोर्चा.
सन १९७१ पासून मासळी व्यवसाचा आर्थिक केंद्र बिंदू असलेल्या, राज्यातील मासळी व्यवसायाचा APMC च्या धर्तीवर कार्यरत असलेल्या एकमेव मासळी संकलन आणि वितरण केंद्र असलेल्या, ज्यावर पालघर जिल्हातील डहाणू, सातपाटी अर्नाळा, वसई, ठाणे जिल्ह्यातील उत्तन, मुंबई जिल्ह्यातील वर्सोवा, रायगड जिल्ह्यातील मोरा, अलिबाग, रत्नागिरी जिल्ह्यातील मिरकडवाडा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण पर्यंतचे मच्छिमार मासळी विकण्यासाठी येत असलेल्या अश्या वार्षिक दोन हजार कोटी रुपयांचे उलाढाल असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मासळी मंडई आज बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विषारी धोरणांमुळे संकटात आली आहे.
सदर मासळी मंडईत ३४८ परवानाधारक कार्यरत असून ह्या मध्ये घाऊक मासळी व्यावसायिक ८७, मासळी विक्रेत्या कोळी महिला १५७ आणि इतर घटक १०४ असे विभागणी असून पलटण रोड येथील भूखंड क्रमांक CTS १५०० सरासरी ९० हजार चौ फूट एवढे क्षेत्रफळात संपूर्ण राज्यातून दररोज १५ हजार पेक्षा जास्त मच्छिमार आणि व्यापारी कार्यरत असतात तसेच राज्यभरातून दररोज १५० हुन अधिक मालवाहतूक वाहने अवाक-जावक करत असतात. अश्या ह्या सोन्याच्या अंडी देणाऱ्या उद्योगाला कायमचा संपविण्याचा डाव बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून होत असल्याचा आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र दामोदर तांडेल यांनी केला आहे.
महानगर पालिकेकडून मच्छिमारांची करण्यात आलेल्या फसवणुकीच्या विरोधात आणि मासळी मंडई वाचविण्याकरिता मंगळवार दिनांक २२ जुलै २०२५ रोजी मच्छिमार जन आक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून हजारोच्या संख्येने कोळी बांधव रस्त्यावर उतरणार असून क्रॉफर्ड मार्केट ते बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या मुख्यालयावर कोळी वादळ धडकणार असल्याचे दिनांक १४ जुलै २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत मच्छिमार समिती तर्फे माहिती देण्यात आली.
बृंहन्मुंबई महानगर पालिकेने मच्छिमारांसाठी आंतराष्ट्रीय दर्जाचे मासळी मंडई क्रॉफर्ड मार्केट येथील महात्मा ज्योतिबा फुले (MJP) मंडईत करण्याचे आश्वासन दिले होते परंतु कुठल्या आंतराष्ट्रीय मासळी बाजार पेठे बेसमेंट मध्ये होत आहे ह्याचा खुलासा महापालिकेने करावा आणि ह्याच मुद्द्यावर मासळी मंडईतील व्यावसायिकांनी ह्या अन्यायकारक स्थलांतराला विरोध दर्शविला होता परंतु मच्छिमारांच्या विरोधाला न झुगारता पालिकेने पलटण रोड येथील मासळी मंडईच्या भूखंडावरून आरक्षण परस्पर काढून टाकल्यानंतर हा भूखंड “आवा डेव्हलपर” ह्या व्यावसायिकाला नाममात्र ३६९ कोटी रुपयाला ३० वर्षे भाडेकरारावर बहाल करण्यात आले आणि विशेष म्हणजे पुढील ३० वर्षांचा भाडेकरार नाममात्र रुपये १ ते रुपये १००१/- इतक्याने देण्यात आले आहे. म्हणजेच दक्षिण मुंबई येथील प्राईम लोकेशनवर असलेल्या २ एकरचा ह्या भूखंडाला ३७० कोटी रुपयाने ६० वर्षांसाठी देण्यात आले असल्याने ह्या संपूर्ण व्यवहारात शंका निर्माण होत असल्याचे मत दि मुंबई फ्रेश फिश असोसिएशनचे अध्यक्ष आणि माथाडी कामगार नेते बळवंतराव पवार ह्यांनी माहिती देताना शंका व्यक्त केली.
मच्छिमारांनी ह्या संशयित गैरव्यवहारावर बोट ठेवत ४०० कोटी रुपयाला हा भूखंड कोळी समाजाला देण्याची मागणी केली असून जो पर्यंत हा हक्काचा भूखंड कोळी समाजाला मिळणार नाही तो पर्यंत पालिकेच्या विरोधात आंदोलनाचे सत्र सुरु राहणार असून मच्छिमार जन आक्रोश मोर्च्याच्या माध्यमातून कोळी समाज आपला आक्रोश व्यक्त करणार आहे. मच्छिमार विरोधावर ठाम राहून ह्या भूखंडावरून आपला व्यवसाय इतर दुसरी कडे हलविणार नसल्याची माहिती पत्रकार परिषेदत देण्यात आली. विशेष म्हणजे एका बड्या व्यावसायिकाच्या हितासाठी लाखो भूमिपुत्रांचा व्यवसाय संपुष्ट करण्याचा नाद पालिकेने केला असून मासळी मंडईतील व्यावसायिकांना समोरील फुटपाथ वर व्यवसाय करण्यासाठी पालिका प्रवृत्त करीत असून पालिकेच्या ह्या मनसुब्याला पाणी फेरणार असल्याचे ठाम मत मच्छिमार समितीचे सरचिटणीस संजय कोळी ह्यांच्याकडून सांगण्यात आले.
सदर भूखंड उद्योजकाला देण्याची घाई झाल्यामुळे आणि पालिकेला मासळी मंडईची अडचण निर्माण झाली असल्याकारणाने मासळी व्यवसायीकांना पालिकेकडून नोटिसा देण्यात आले आहेत ज्यामध्ये त्यांना मंडई समोरील फुटपाथ वर तात्पुरती शेड निर्माण करून आपला व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त केले जात आहे. महात्मा ज्योतिबा फुले मंडईतील काम सन २०१६ साली सुरु झाले असून अद्याप ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. अश्यात स्थलांतराची जागा पूर्ण झाली नसताना पालिकेला झालेली घाई संशय निर्माण करणारी असल्याचे मत मच्छीमारांकडून पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आले. तसेच ताडदेव येथील मासळी विक्रेत्या कोळी महिलांचा उद्गरनिर्वाह बेलासिस ब्रिजच्या बांधकामामुळे धोक्यात आल्याने या महिलांना नव्याने बाजार विभागाचे परवाने जारी करण्याची मागणी पालिकेकडे करण्यात आली असून पालिकेच्या अमानुष करोबाराच्या विरोधात मच्छिमार समाज आक्रमक झाला असून दिनांक २२ जुलै रोजी होणाऱ्या मोर्च्यात राज्यातून हजारो मच्छिमार सहभागी होऊन पालिकेच्या विरोधात निर्दर्शने करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे महिला अध्यक्षा नयना पाटील यांनी दिली. दिनांक १४ जुलै २०२५ रोजी झालेल्या पत्रकार परिषदेत अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती, दि मुंबई फ्रेश फिश असोसिएशन, मुंबई जिल्हा कोळी महिला विविध कार्यकारी सहकारी संस्था लिमिटेड, शाश्वत कोकण परिषदेचे सत्यजित चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते.