रत्नागिरी (राधा लवेकर) : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील हातखंबा शाळेजवळील धोकादायक वळणावर सोमवारी (२८ जुलै) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एलपीजी गॅसने भरलेला एक टँकर २५ फूट खोल दरीत कोसळल्याने खळबळ उडाली. अपघातामुळे टँकरमधून गॅसची गळती सुरू झाली आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भीषण अपघातात टँकर चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तात्काळ जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या नाणीज संस्थेच्या रुग्णवाहिकेने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र यादव सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत होम डीवायएसपी फडके मॅडम, एलसीबीचे निरीक्षक नितीन ढेरे, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील आणि आरटीओ पोलीस अधिकारीही तात्काळ पोहोचले. मध्यरात्रीपासूनच अपघातस्थळी आणि हातखंबा तिठ्यावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला. जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह, प्रांताधिकारी जीवन देसाई आणि अप्पर निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी घटनास्थळी हजेरी लावली.
गॅस गळतीमुळे निर्माण झालेल्या संकटाला तोंड देण्यासाठी एमआयडीसीचे विशेष पथक, तीन अग्निशामक बंब, रुग्णवाहिका, पोलीस आणि महसूल यंत्रणा एकत्रितपणे कामाला लागली. संभाव्य धोका टाळण्यासाठी अपघातस्थळाजवळील नागरिकांचे तात्काळ स्थलांतर करण्यात आले. पोलीस अधीक्षक बगाटे यांच्या नेतृत्वाखाली गॅस गळती रोखण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आणि काही तासांच्या अथक परिश्रमानंतर परिस्थिती नियंत्रणात आणली गेली. मध्यरात्री २ वाजल्यापासून सकाळी ११ वाजेपर्यंत गॅसचा साठा दुसऱ्या रिकाम्या टँकरमध्ये सुरक्षितपणे ट्रान्सफर करण्यात आला. दरम्यान, हातखंबा-पाली मार्गावरील वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात आली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बावनदीमार्गे पालीकडे, तर लांजा मार्गावरील वाहने कुवारबाव-काजरघाटी मार्गे किंवा पावस मार्गे लांजा अशी वळवण्यात येत आहेत.
अलीकडेच निवळी घाटात झालेल्या गॅस टँकर अपघाताची आठवण ताजी असतानाच, हातखंबा येथील ही दुसरी घटना प्रशासनासाठी एक आव्हान होती. मात्र, पोलीस अधीक्षक आयपीएस नितीन बगाटे यांच्या नेतृत्वगुणांमुळे आणि विविध यंत्रणांच्या अचूक समन्वयामुळे हा मोठा अनर्थ टळला. गॅस गळतीसारख्या अत्यंत धोकादायक परिस्थितीत वेळेवर घेतलेले निर्णय, रात्रभर चाललेली बचाव कारवाई आणि विविध घटकांमधील एकजूट यामुळे रत्नागिरी पोलीस दलाच्या कार्यक्षमतेचा आदर्श नमुना समोर आला आहे.
Trending
- गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे प्रजासत्ताक दिनी भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी आमरण उपोषण करण्याची वेळ
- डोंबिवलीतील शांतीनगर विद्यालयाचे वार्षिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न..
- कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा कार्यकारिणीची गुहागर शाखेतील सभा उत्साहात संपन्न
- हरिनामाला पैशामध्ये तोलुन लालसेपोटी फसवणूक करणा-या भजनीबुवाला गुहागरमध्ये आजीवन बंदी !
- उमराठ ग्रामपंचायतचा अनोखा उपक्रम; संध्याकाळी ७ ते ९ पुर्णत: टिव्ही, मोबाईल व रेडिओ बंद
- सकाळी ७.२९ रेल्वे डब्यात साई भजन मंडळाने मोठ्या उत्साहात दसरा सण केला साजरा
- छ. शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा निमित्ताने काताळे ग्रामपंचायत मध्ये शासन आपल्या दारी उपक्रम
- डॉ. विजयकुमार डोंगरे यांच्यावरील सेवाव्रती लघुपटाचा मोफत प्रीमियर शो चित्रपट रसिकांसाठी समीक्षण स्पर्धा

