ठाणे : गणेशोत्सवाची तयारी सुरू होत असताना, घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक शाडूमातीबरोबरच यंदा इतर नैसर्गिक साहित्य वापरून तयार करण्यात आलेल्या मूर्तींचा पर्याय उपलब्ध झाला आहे. पर्यावरणाचे रक्षण आणि पाण्याचे प्रदूषण टाळण्याच्या दृष्टीने नागरिक अधिक जागरूक झाले असून, पर्यावरणपूरक गणेशमूर्तींची मागणी वाढत असल्याची माहिती ठाणे शहरातील काही गणेशमूर्तिकारांनी दिली.
प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) बंदीचा विषय गेले अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपुरक बनवण्यावर भर दिला जात होता. त्यानुसार, जलस्त्रोतांचे होत असलेले प्रदुषण लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) गणेशमूर्तींवर बंदी घातली होती. परंतू, यानिर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि गणेश मुर्तीकारांनी नाराजी व्यक्त केली होती. अखेर ९ जून ला प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या गणेशमुर्तींवरील बंदी उठवली. या निर्णयामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह गणेशमुर्तीकारांना देखील काहीसा दिलासा मिळाला.
परंतू, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तीमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांविषयी सातत्याने होत असलेल्या चर्चा आणि जनजागृतीमुळे नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृकता निर्माण झाली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी घरगुती गणेशोत्सवासाठी पर्यावरणपूरक गणेशमुर्तींना मोठ्याप्रमाणात मागणी असल्याची माहिती ठाण्यातील एका गणेशमुर्तीकारांनी दिली. यंदा पर्यावरणपूरक गणेश मुर्तींमध्ये शाडूमातींसह आणखी काही पर्याय उपलब्ध झाले आहेत. या मुर्ती पीओपी आणि शाडू मातीप्रमाणे सुबक आणि आकर्षक असल्यामुळे नागरिकांच्या पसंतीस पडत आहेत. ठाणे, डोंबिवली, कल्याण सह इतर शहरात देखील या मूर्तींना मोठ्याप्रमाणात मागणी असल्याची माहिती गणेशमुर्तीकारांनी दिली.

