गुहागर [दिनेश खेडेकर ] : मरणोत्तर मान सन्मान मिळवणं ही प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक अपेक्षा असते. पण जेव्हा त्या सन्मानात चिखल मिसळतो, तेव्हा ती केवळ विकासाची नाही, तर माणुसकीचीही हार ठरते.
रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत जनसुविधा योजनेतून चिपळूण तालुक्यातील कळंबट ग्रामदेवता देवरहाटी परिसरात रु. ३,९९,९६८ खर्च करून स्मशानशेड उभारण्याचे काम जानेवारी २०२५ मध्ये सुरू झाले. प्रारंभी ग्रामस्थांच्या आशा उंचावल्या; मात्र आज सात महिने उलटूनही हे काम अर्धवट अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, कंत्राटदाराला कामाच्या एक तृतीयांशहून अधिक रक्कम आगाऊ अदा करण्यात आली आहे.
दरम्यान पावसाळा सुरू झाला आणि अपूर्ण स्मशानशेडचे वास्तव समोर आले. शेजारील मोकळ्या जागेत चिखल, गटारे आणि पावसात अंत्यविधी करावे लागत आहे. ही स्थिती गावकऱ्यांना मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या व्यथित करणारी आहे. उभ्या स्मशानशेडच्या शेजारीच ही दुर्दशा घडते आहे. स्मशानशेड ही केवळ भौतिक सुविधा नसून मरणोत्तर सन्मानाची बाब असते. मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ही गरजही अपूर्ण राहिली आहे. अशा संवेदनशील कामात प्रशासनाची उदासीनता आणि जबाबदारीची टाळाटाळ ग्रामीण भागातील ‘विकास’ नावाच्या संकल्पनेचा कटू वास्तव प्रतिबिंबित होतो.
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरी उलटली तरी मूलभूत सुविधांची वानवा. पंचाहत्तर वर्षे उलटून गेली, विकासाच्या कित्येक गप्पा ऐकल्या गेल्या, पण खऱ्या अर्थाने मूलभूत सुविधांची पूर्तता अजूनही धूसरच आहे. याचेच एक विदारक उदाहरण म्हणजे गावातील नवीन स्मशानभूमीचे रखडलेले काम. मग नवीन स्मशानभूमी कशासाठी उभी केली? केवळ कागदावर प्रगती दाखवण्यासाठी का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करीत आहेत. त्यामुळे या रखडलेल्या कामाची तात्काळ चौकशी करून संबंधित कंत्राटदाराची जबाबदारी ठरवावी, कामाचा दर्जा तपासून ते त्वरित पूर्ण करून स्मशानशेड ग्रामस्थांच्या वापरासाठी खुले करावे, आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

