गुहागर : गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील घरटवाडीमध्ये जमिनीच्या वादातून झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेच्या अभावाचा अनुभव भुवड कुटुंबीयांना चांगलाच आला आहे. भुवड कुटुंबीयांच्या तक्रारी वरून गुहागर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. त्यामुळे संपूर्ण परिसर दहशतीखाली असल्याचा आरोप पीडित भुवड कुटुंबीयांनी केला आहे. भुवड कुटुंबीयांनी गुहागर पोलिसांकडून न्याय न मिळाल्याने २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरु केल आहे. या उपोषणातून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्याचे तसेच सदर प्रकरणात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी लक्ष घालण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग त्यांनी निवडला आहे.
वेलदूर घरटवाडी येथे गणपत धाकू भुवड (वय ६९) आणि त्यांच्या पत्नी शालिनी भुवड यांच्यावर लाकडी बांबू व लोखंडी पाईपने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गणपत भुवड गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पांडुरंग रघुनाथ भुवड (६०) आणि त्याच्या तीन साथीदारांविरोधात गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भुवड कुटुंबीयांनी निवेदनात म्हटले आहे की, आरोपीनी केवळ मारहाणच केली नाही तर जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत, असे असतानाही गुहागर पोलीस सदरच्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने न्यायव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात जमिनीबाबतचा खटला गुहागर न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात वाद प्रलंबित असतानाही संशयित पांडुरंग भुवड याने तीन कामगारांसह फिर्यादींच्या घरासमोरील बांध फोडण्याचा प्रयत्न केला. सदरच्या प्रकाराला विरोध केल्यावर गणपत भुवड व त्यांच्या पत्नीवर हल्ला केला, तसेच शिवीगाळ व धमक्याही देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे. मात्र, तपासाच्या नावाखाली गुहागर पोलीस कारवाईला विलंब करत असल्याची तीव्र टीका केली आहे. त्यामुळे गुहागर पोलिसांच्या कर्तव्य तत्परतेमुळे गणपत भुवड कुटुंबीयांवर न्यायासाठी प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करण्याची वेळ आली आहे. गणपत भुवड कुटुंबीयांनी न्याय मिळेपर्यंत प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

