वेळणेश्वर I प्रतिनिधी : वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दि. २७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ कवी व साहित्यिक कुसुमाग्रज (वि. वा. शिरवाडकर) यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या मध्यवर्ती संगणक प्रयोगशाळेत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेचा अभिमान, संवर्धनाची जाणीव आणि तांत्रिक शिक्षणात मातृभाषेचा प्रभावी वापर याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून भाभा अणुसंशोधन केंद्र (BARC) येथील माजी अभियंता व ग्रंथ अनुवादक श्री. नरेंद्र गोळे उपस्थित राहणार आहेत. “मराठी भाषेत तांत्रिक शब्दांचा वापर” या विषयावर ते मार्गदर्शन करणार असून अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना मातृभाषेचा प्रभावी वापर कसा करता येईल, याबाबत विद्यार्थ्यांना दिशा देणार आहेत. मराठीतून तांत्रिक संकल्पना स्पष्ट करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना तसेच तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मराठीचा वाढता वापर या विषयांवर ते सविस्तर विवेचन करणार आहेत.
याच अनुषंगाने मध्यवर्ती ग्रंथालय विभागात मराठी ग्रंथप्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात मराठी साहित्य, विज्ञान-तंत्रज्ञान विषयक पुस्तके, विविध संदर्भग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या ग्रंथप्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृतीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना मातृभाषेचे महत्त्व अधोरेखित होणार असून तांत्रिक शिक्षणासोबतच मराठीचा सशक्त आणि प्रभावी वापर करण्याची प्रेरणा मिळणार आहे. सदर कार्यक्रमास प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने ग्रंथपाल डॉ.संतोष चतुर्भुज यांनी केले आहे.

