मुंबई : भांडुप पश्चिम परिसरातील एका खासगी शाळेत बुधवारी ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार २७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शाळेच्या बेसमेंटमध्ये १० व ११ वर्षीय दोन मुली योगासने करत होत्या. शाळेतील उद्वाहनाच्या दुरुस्तीसाठी आलेल्या एका कर्मचाऱ्याने दहा वर्षांच्या दोन, तर १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरात घडली. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
शाळेच्या इमारतीमधील उद्वाहन नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त करण्यासाठी याठिकाणी दोन कर्मचारी आले होते. यापैकी एका कर्मचाऱ्याने १० वर्षांच्या दोन आणि १२ वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. घरी परतल्यानंतर मुलींनी ही बाब त्यांच्या पालकांना सांगितली. त्यानंतर पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी गोपाल गौडा (२७) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. यात भारतीय न्याय संहिता ७४, ७८ आणि POCSO ८, १२ अंतर्गत गुन्हा नोंदवत संशयित आरोपीला अटक केली आहे. कुटुंबियांनी आरोप केला की, प्रकरण दाबण्यासाठी व पोलिसात तक्रार करू नये यासाठी शाळेकडून दबाव टाकण्यात आला. तसेच पालकांना सीसीटिव्ही फुटेजही पाहू दिले नाही.