गुहागर प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव ग्रामपंचायत येथील बांगलादेशी नागरिकाला जन्म दाखला दिलेल्या प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करावी अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे.
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव ग्रामपंचायतीमार्फत एका व्यक्तीला जन्म दाखला देण्यात आला होता. सदर व्यक्ती मुंबई पोलिसांनी महत्त्वाच्या गुन्ह्यात आरोपी म्हणून अटक केली व सदर चौकशी करत असताना ग्रामपंचायतीने त्या व्यक्तीला बांगलादेशी असताना सुद्धा जन्म दाखला दिला आहे. या प्रकरणाची पाळेमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये असू शकतात कारण बांधकाम व्यवसाय, मच्छीमार व्यवसाय यामध्ये अनेक बांगलादेशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वास्तव्य करत आहेत.
मालेगाव, नाशिक येथील बनावट जन्म दाखले चौकशी करण्याकरता शासनाने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र यांचे अध्यक्षतेखाली एक एसआयटी बनवली आहे. त्याचप्रमाणे कोकण विभागाची एक स्वतंत्र विशेष तपास समिती निर्माण करावी किंवा नाशिक येथे निर्माण केलेल्या विशेष तपास समितीकडे कोकण विभागाचे कामही सोपवण्यात यावे. ज्यामुळे कोकण किनारपट्टी मध्ये जवळजवळ प्रत्येक तालुक्यात असणाऱ्या बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांची सखोल चौकशी होईल व कोकणातील समुद्रकिनारी घातपाताच्या प्रकाराला आवर घालता येईल. तरी संबंधित प्रशासनाला तातडीने चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी डॉ. नातू यांनी केली आहे.