मुंबई प्रतिनिधी : आज छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार ३९५ वी जयंती साजरी केली जात आहे. दरम्यान या निमित्ताने अनेक जण किल्ले शिवनेरी गडावर जमा झाले होते. कालपासून अनेक शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर महाराजांना अभिवादन करण्यासाठी जात होते. मात्र सध्या शिवनेरी गडावर जाण्यासाठी वनविभागाकडून बंदी घालण्यात आली आहे.
काही अज्ञातांनी मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला होता. कालही अनेक पर्यटकांवर मशमाशांनी हल्ला केला होता. आजही मधमाशांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. मंत्री नितेश राणे शिवनेरी गडावर असताना मधमाशांचा दुसऱ्या दिवशी हल्ला झाला. त्यामुळे मधमाशा शांत होईपर्यत शिवनेरी गड शिवभक्तांसाठी बंद करण्यात येत असल्याचे वनविभागाने जाहीर केलं आहे. दरम्यान मधमाशांच्या पोळ्यावर हल्ला करणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. त्यांची चौकशी होणार असल्याचं वनविभागाकडून स्पष्ट करण्यात आलं.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९ फेब्रुवारी १६३० मध्ये झाला. आज १७ मार्च रोजी तिथीनुसार महाराजांची जयंती साजरी केली जात आहे. यानिमित्ताने राज्यभरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. १६ मार्चला शिवनेरीमध्ये गेलेल्या ५० ते ६० पर्यटकांवर मशमाशांनी हल्ला केला होता. यामध्ये १० ते १२ पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. काळजी म्हणून वन विभागाने शिवनेरी किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

