पुणे प्रतिनिधी : शहरातील प्रमुख मार्गांसह राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), भारतीय राजमार्ग प्राधिकरण, (एनएचएआय) आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विशेष मोहिमेचा दुसरा टप्पा आजपासून (१७ मार्च) सुरू होणार आहे. नवले पूल, सारोळे, सूस रस्ता, हडपसर (शेवाळवाडी), दिवे घाट, नवलाख उंब्रे-चाकण, हिंजवडी-माण, शिक्रापूर या मार्गांवरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येणार आहे. ३० मार्चपर्यंत ही कारवाई मोहीम राबवून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढण्यात येणार असल्याचा दावा ‘पीएमआरडीए’कडून करण्यात आला आहे.
शहरासह जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत चालली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ने संयुक्त कारवाई मोहीम हाती घेतली आहे. महामार्ग व राज्यमार्ग रस्त्यालगत असणारी दुकाने, पत्राशेड, गाळे, टपरी व अनधिकृत बांधकामधारकांना नोटीस बजावून मुदतीच्या आत बांधकाम काढण्याची कल्पना दिली आहे. संबंधितांनी स्वत: अतिक्रमणे काढून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी केले आहे.
शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी संयुक्त कारवाई करण्यात येत आहे. त्यामध्ये ‘पीएमआरडीए’, ‘एनएचएआय’, पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे शहर आणि पोलीस, वाहतूक पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी), महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), महाराष्ट्र विद्युत वितरण महामंडळ (एमएसईबी).

