चिपळूण प्रतिनिधी [ स्वाती हडकर ] : ७ वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी प्रकाश शंकर वाघे याला चिपळूण येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डॉ. अनिता श्रीरंग नेवसे यांनी जन्मठेपेची शिक्षा व २५ हजाराचा दंड ठोठावला आहे. ही घटना ६ ऑक्टोबर २०१९ रोजी गुहागर तालुक्यात घडली होती.
गुन्ह्याचा सखोल तपास करुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केलं होतं. या खटल्याची सुनावणी चिपळूण येथील न्या. डॉ. अनिता एस. नेवसे यांच्या समोर झाली. ज्येष्ठ सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी याप्रकरणी १० साक्षीदार तपासून सबळ पुरावे न्यायालयासमोर सादर केले.
पीडित बालिका आपल्या भावासोबत व शेजारील मुलासोबत घराशेजारी खेळत होती. त्यावेळी आरोपी प्रकाश वाघे तिथे आला व लाकडे शोधायला गुरांच्याकडे चल, असे म्हणून तिला कलांडी येथील जंगलमय भागात घेवून गेला. व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने त्याच्या तावडीतून कशीबशी सुटका करुन घेत सरळ घर गाठले व सर्व हकिकत तिच्या आईला सांगितली. त्यानंतर तिच्या आईने गुहागर पोलीस ठाण्यामध्ये आरोपीविरुध्द तक्रार दिली होती.