पुणे : पुणे वनपरिक्षेत्रातील मौजे भिलारवाडी (ता. हवेली) येथे व्हेल माशाची उलटी आणि चिंकारा या वन्यप्राण्याच्या शिंगांची विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानुसार वन विभागाने निसर्ग हाॅटेल येथे छापा टाकून तस्करी होणारे अवयव जप्त केले. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा लावून ७५ लाख रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी (अंबर ग्रेस) आणि २५ हजार रुपये किमतीची चिंकाराची शिंगे ताब्यात घेतली. याप्रकरणी हेमराव सिकंदर मेहता (रा. बालाजीनगर) आणि ऋतिक नवनाथ लेकुरवाळे (रा. थेरगाव) यांना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सहायक वनसंरक्षक मंगेश ताठे यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी ही कारवाई केली. त्यांच्यासमवेत वनपरिमंडळ अधिकारी विशाल यादव, प्रमोद रासकर, वैभव बाबर, वनरक्षक संभाजी गायकवाड, अनिल राठोड, राजकुमार जाधव, श्रीराम जगताप, ओंकार गुंड, विनायक ताठे सहभागी झाले.