मुंबई प्रतिनिधी : भायखळा येथे बनावट नोटांची विक्री करण्यासाठी आलेल्या टोळीला पकडण्यात मुंबई पोलिसांना यश आले, तसेच नोटा बनविण्यात येणाऱ्या पालघर जिल्ह्यातील ठिकाणावर छापा टाकून सर्व साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणात उमरान ऊर्फ आसिफ बलबले (४८), यासिन शेख (४२), भीम बडेला (४५), नीरज वेखंडे (२५) आदींना अटक करण्यात आली आहे.
भायखळा पूर्व येथे तीन जण भारतीय चलनाच्या बनावट नोटांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती भायखळा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. त्यानंतर संबंधित ठिकाणी दोन पथके तैनात करण्यात आली. काही वेळात त्या ठिकाणी आलेल्या तीन संशयित व्यक्तींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे बनावट नोटा सापडल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करून तिघांना अटक करण्यात आली.
चौकशीअंती पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात बनावट नोटा छापण्यात येत असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. दोन दिवस अन्य आरोपींचा शोध घेतल्यानंतर त्यांना नोटा छापण्यात येणाऱ्या ठिकाणाची माहिती मिळाली. संबंधित ठिकाणी नोटा छापण्यासाठी लागणारे साहित्य आढळून आले. पोलिसांनी छापा टाकलेल्या ठिकाणावरून लॅपटॉप, प्रिंटर, लॅमिनेटर, ए-फोर आकाराचे बटर पेपर, यांत्रिकी शेगडी आदी विविध स्टेशनरी साहित्य जप्त करण्यात आले आहे.

