पुणे प्रतिनिधी : महापालिकेचे शंभर स्वच्छता कर्मचारी स्वच्छतेचा अभ्यास करण्यासाठी इंदूर दौऱ्यावर जाणार आहेत. कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी मदत व्हावी, यासाठी ५ ते ७ फेब्रुवारी दरम्यान हा अभ्यास दौरा होणार आहे.
केंद्र सरकारच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या स्पर्धेत गेल्या सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात इंदूर शहराला पहिला क्रमांक मिळत आहे. या शहरामध्ये स्वच्छतेसाठी काय केले जाते, याची माहिती महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना व्हावी, यासाठी एक दौरा केला जात आहे. हेमंत रासने यांनी आमदार म्हणून विजयी झाल्यानंतर ‘स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा’ हे अभियान मतदारसंघात सुरू केले आहे. त्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न केले जात आहेत. या अभियानाचा भाग म्हणून हा दौरा काढण्यात आल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इंदूर शहरातील कचरा प्रक्रिया प्रकल्प तसेच प्रत्यक्षात नियोजनबद्धपणे करण्यात येणारे कचरा संकलन याची पाहणी केली जाणार आहे. इंदूर स्मार्ट सिटीच्या प्रमुख श्रद्धा तोमर यावेळी सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी उज्जैनला देखील भेट दिली जाणार असून, तेथील धार्मिक स्थळांच्या विकासाचे मॉडेल आपल्याकडे राबवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असेही आमदार रासने यांनी सांगितले.

