रायगड प्रतिनिधी : रोहा तालुक्यात इंदरदेव येथील धनगर वाडी येथील ४८ घरे वणव्यात जळून खाक झाली. या दुर्घटनेत सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे. वणवा नेमका कसा लागला याचे कारण समजू शकलेले नाही. उन्हाळ्यात जंगलांना मोठ्या प्रमाणात वणवे लागतात. यातील काही नैसर्गिक तर काही मानव निर्मित असतात. यामुळे जंगलातील वनसंपदेचे नुकसान होते. त्याचबरोबर आसपासच्या मानवी वस्तीलाही या वणव्यांची झळ बसते. रोहा तालुक्यातील इंदरदेव येथील धनगर वाडीतील रहिवाश्यांना याचाच प्रत्यय आला.
वाडीवरील रहिवाशांना गुरुवारी सायंकाळी वणवा वाडीपरिसरात पसरल्याचे लक्षात आले. मात्र तोवर वणव्याने चहू बाजूने वाडीला वेढले होते. आगीवर निंयत्रण मिळवण्यासाठी तातडीने रोहा येथून अग्नीशमन दलाला तसेच एसव्हीआरएस बचाव पथकांना पाचारण करण्यात आले. स्थानिक नागरीकही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. मात्र आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत ४८ घरे जळून खाक नष्ट झाली.
▪️वणव्याचे दुष्परिणाम : सातत्याने लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा अडचणीत आली आहे. वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पशुपक्ष्यांचे हकनाक बळी जातात. सुरुवातीला जंगलापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न आता आसपासच्या परिसरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्याच्या घटना मागील काही वर्षात समोर आल्या आहेत. वणव्यांमुळे प्रदेशनिष्ठ वनस्पती धोक्यात येत आहे. यात प्रामुख्याने गवताळ कुरणे, दगडफूल, सोनकी प्रकार, कारवी जाती, पानफुटी, कलारगा झाडी, तेरडा, श्वेतांबरी, रानआले, सोनजाई, गजकर्णिका, रानकेळी, सापकांदा, टोपली कारवी, कुळी कापुरली संजीवनी, सर्पगंधा, अश्वगंधा यांसारख्या वनस्पतींचा समावेश आहे. तर घुबड, चंडोल, रॉबिन रानकोंबडय़ा, मोर, सापांच्या प्रजाती गवतावरील कीटक, उंदीर, भेकरे यांसारख्या पशुपक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. पुर्वी मुबलक प्रमाणात आढळणारे वन्यजीव आता दिसेनासे होत चालले आहेत. कोकणात १८४ प्रकारच्या फुलपाखरांच्या प्रजातीही वणव्यांमुळे अडचणीत सापडल्या आहेत.

