गुहागर प्रतिनिधी : गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांच्या कार्यपद्धतीवर गुहागरमधील गोरक्षक श्रीराम विचारे, विजय नागवेकर, गजानन दीक्षित, अजय नागवेकर, रवींद्र कानिटकर, अशोक जोग, अनिरुद्ध भावे, विनायक गुहागरकर, मिनार पाटील आदींनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या सर्वांनी नुकतीच मे. तहसीलदार गुहागर यांची भेट घेत काही दिवसांपूर्वी घडलेले गोमाता तस्करी प्रकरणाचे गांभीर्य न जाणता आरोपींच्या फायद्याचा तपास करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुहागरचे पोलिस ठाण्याचे निरिक्षक सावंत यांच्या बदलीसाठी निवेदन देत तातडीने बदलीची मागणी केली आहे. बदली न केल्यास येत्या २६ जाने. प्रजासत्ताक दिनी तहसिलदार कार्यालय गुहागर यांचे समोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
गोमाता तस्करी प्रकरण जाणून घेऊया…
दि. १२/१२/२०२४ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वरील गोरक्षकांनी गायींची बेकायदेशीर व विनापरवाना वाहतूक करताना रंगेहाथ जावेव वाळवटकर यास पकडून गुहागर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. सदरच्या घटनेमध्ये जावेव वाळवटकर हा ३ गायी, २ पाडे, १ बैल व १ वासरू यांची बेकायदेशीर व विनापरवाना वाहतूक करत होता. यात संतापाची बाब म्हणजे एक गाय मृत अवस्थेत आढळून आली. त्यानंतर पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांनी सदर प्रकरणातील आरोपी यांचेविरूद्ध, ‘प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला. मात्र सर्व कलमे हि जामीनपात्र स्वरूपाची असल्याने त्याचा फायदा संबंधित आरोपींना झाला. त्यामुळे सर्व आरोपी २४ तासांच्या आत जामिनावर मुक्त झाले.
गोरक्षक म्हणतात, महाराष्ट्र राज्याने गाईला “राज्य गोमाता” हा दर्जा दिलेला आहे. गाय हे आमचे धार्मिक श्रध्दास्थान असुन गायीला आम्ही मातेचा दर्जा दिलेला आहे. गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक श्री. सचिन सावंत यांनी जावेव वाळवटकर हा गायींची बेकायदेशीर व विनापरवाना वाहतूक करत असताना त्यात गाय मृत अवस्थेत सापडल्यानंतरही त्या गायीच्या मृत्यूचे कारण शोधणे, मृत गायीची वाहतुक व अन्य गायीची वाहतुक करून कोठे घेवून जात होते याचा तपास करणे, संबंधित व संशयित आरोपींचे कोणत्या कत्तलखान्यासोबत लागेबंधे आहे हे शोधुन काढणे व त्याच्या मुळापर्यंत पोहोचणे या सर्व बाबी उजेडात आणण्यासाठी कोणतीही तत्परता व गांभीर्य दाखवले नाही. गोहत्या प्रतिबंध कायद्यामध्ये गायींच्या वाहतुकीसारख्या गंभीर गुन्ह्यांचे तपासकाम पोलिस उपनिरिक्षक दर्जापेक्षा वरिष्ठ वर्जाच्या अधिकाऱ्यांनी करायची स्पष्ट तरतूद केलेली असताना सुद्धा पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांनी हा गंभीर गुन्हा पोलिस हवालदार यांचेकडे तपासासाठी दिला. यातुनच पोलिस निरिक्षक सचिन सावंत हे किती बेजबाबदार आहेत हे दिसुन येते. या सर्व प्रकारांमुळे आमच्या धार्मिक भावना प्रचंड दुखावलेल्या असून गुहागर तालुक्यामधील गोरक्षकांमध्ये अत्यंत संतापाचे वातावरण आहे. त्यामुळे गोरक्षकांनी मे. तहसीलदार, गुहागर यांना गुहागर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांची तातडीने बदली करावी अशी मागणी केली आहे. तातडीने बदली न केल्यास येत्या २६ जाने. रोजी ‘प्रजासत्ताक दिनी’ तहसिलदार कार्यालय गुहागर यांचे समोर बेमुदत उपोषणास बसण्याचा गोराक्षकांनी इशारा ही दिला आहे.

