कोल्हापूर प्रतिनिधी : भारतीय लोकशाही ही एकता व अखंडतेचे प्रतीक आहे. ती आणखीन मजबूत व्हावी, यासाठी मतदारांनी मतदानाबाबत अधिक जागृत व्हावे व लोकशाही आणखीन बळकट करावी या उद्देशाने भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने २५ जानेवारी हा दिवस ‘राष्ट्रीय मतदार दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्च्याहापूर च्यावतीने तेथील प्रांगणातून १५ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जनजागृती रॅलीला सुरुवात झाली. या रॅलीला करवीर प्रांत अधिकारी हरीश धार्मिक यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला .
“मतदार राजा जागा हो; लोकशाहीचा धागा हो ! “मतदान आमचे – राष्ट्रीय कर्तव्य, मत द्या – आपला आवाज ऐकू द्या ! , “जना – मनाची पुकार मतदान आपला अधिकार” यासारख्या घोषणा विद्यार्थ्यांनी दिल्या. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय , पॅव्हेलियन / सायबा हॉटेल, दसरा चौक मार्गे श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय येथे विसर्जित करण्यात आली. या रॅलीत देशभूषण, दादासो मगदूम, होली क्रॉस, नेहरू व राजश्री शाहू हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यावेळी करवीर तहसीलदार स्वप्निल रावडे, निवडणूक तहसीलदार महेश खिलारी, नायब तहसीलदार सर्वश्री जयंत गुरव, बी. बी. बोडके, शिवाजी गवळी, पी. जी. पाटील यांच्यासह इतर शाळांचे शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

