✍🏻 नवे वर्ष, नवे सरकार, नवे संकल्प !
दर वर्षी नवे वर्ष अखेरीस जुने होते.तसंच काहीस सरकारचे आहे.जुनेच चेहरे नव्या सरकारात फक्त खांदेपालट होतात. बाकी व्यवस्थेत काही बदल होत नाही.नवे सरकार आल्यावर नव्या घोषणा होतात. अमलबजावणी होते की नाही ते कोण पाहणार, अरबी समुद्रात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा उभारणार म्हणून घोषणा झाली ,भूमीपूजन पंतप्रधानांनी केले होते तरी आठ वर्षांत महाराष्ट्राचे दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला नाही.मराठी अस्मितेचा विसर पडला.भारतरत्न, भारतीय घटनेचे शिल्पकार वंदनीय डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक मुंबईतील इंदू मिलच्या जागेवर बांधणार घोषणा झाली.मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ पूर्ण करण्याचे वायदे अनेकदा दिले गेले महामार्ग पूर्ण होण्यास अजून किती वर्षे लागतील ते परमेश्वर जाणो संकल्पाची घोषणा केल्यानंतर ते पूर्ण करणे सरकारचे कर्तव्य आहे.कोकणातील पायाभूत सुविधांची वानवा आहे.जिल्हा परिषदचे रस्ते,सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते दळणवळणाचे मुख्य साधन आहे. कोकणातील एस.टी.वाहतूक सेवा व्हेंटिलेटरवर आहे. पुरेशा बस नाहीत. आहेत त्या बिघडलेल्या.वाहन चालक आणि वाहक यांची रिक्त पदे,एस.टी.आगारात प्रवाशांना आवश्यक सेवा सुविधा नाहीत. मुतारी,शौचालय यांची दुरावस्था,उपहारगृहाची सुविधा नाही.या सरकार कडून माफक अपेक्षा आहेत. प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या खात्याचा कारभार इमाने इतबारे करावा.नियमानुसार कामे करावीत. भारतीय घटनेने घालून दिलेल्या नियमांचे ,कायद्याचे पालन करावे.शाळा प्रवेश घेताना डोनेशन पद्धत पूर्णपणे बंद करावी.शिक्षणातील निर्णय शिक्षण तज्ज्ञांच्या अनुकूलतेने घ्यावेत. प्रत्येक सरकार मधील शिक्षण मंत्री आपल्या सोईनुसार बदल करतात ते होऊ नयेत. वाढती महागाई रोखावी.फुकट सेवा देण्यापेक्षा सवलतीत द्या. सर्व जनतेला त्याचा लाभ मिळेल.कायदा सुव्यवस्थेबाबत धिंडवडे निघाले आहेत. बीड जिल्ह्य़ातील एका सरपंचांची हत्या झाली गुन्हेगार पकडावे म्हणून जनतेला उठाव करावा लागला गृहमंत्रालयाने पोलीस खात्यात हस्तक्षेप करु नये.सार्वजनिक वाहतूक सेवेवर सर्वसामान्य जनता अवलंबून असते तिला बस वेळेवर घेऊन जाणारी आणि आणून सोडणारी मिळाली की अतिशय आनंद होतो. नव्या सरकारकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो.

