॥दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा॥
निसर्गरम्य कोकणातील रत्नागिरी जिल्हयातील गुहागर तालुक्यातील पालशेत हे एक छोटस गाव. मुक्तहस्ते सृष्टीसौंदर्याची उधळण असलेल्या या एका छोटयाशा निसर्गरम्य परिसरामध्ये डोंगरकपारीत आणि नारळी सुपारीच्या बागांमध्ये अथांग सागराच्या तीरावर सुंदर नदीच्या काठावर नयनरम्सृय ष्टिसौंदर्याने नटलेले गाव…. पालशेत !
पालशेत ही एक तपोभूमी. या तपोभूमीचा डंका सर्व दूरवर पसरलेला आहे. गावापासून २७ कि.मी. दूर असलेल्या तवसाळ या गावातून श्री सदगूरू महंत योगीराज वेद पारंगत अवलिया श्री सदगूरू बाळोजीनाथ फकीरजी सूर्वे हे पालशेतच्या तपोभूमीत पादाक्रांत करून १७ व्या शतकात स्थिरावले. या श्री सदगूरू महंत योगीराजांना माझा प्रथम दंडवत…. सदगूरू बाळोजीनाथ् श्री दत्त गुरूंचे उपासक निर्गुण निरंकार शक्ती अंगीकारून पालशेत गावामध्ये कायमचे स्थिरावले आणि संजीवनी समाधीस्थ झाले.
श्री सदगुरू बाळोजीनाथ फकीरजी सूर्वे यांच्या चरण स्पर्शाने पावन झालेल्या या पालशेत पवित्र भुमीत सदगुरूंना दंडकारण्य भागात भगवान श्री दत्तात्रेयांचे मंदिर उभाराचे होते. मंदिर उभारणीसाठी जागा कशी उपलब्ध होणार हा प्रश्न त्यांच्या पुढे उभा होता. तेव्हा श्री भिकूनाना नार्वेकर(खोत) व श्री बेंडूनाना नार्वेकर (खोत) यांनी त्यांच्या मालकीची मुरूगवाडयातील नवेंदर या ठिकाणी सभोवार गडग्या सहित असलेली जमीन दत्तात्रयांचे मंदिर उभारणीसाठी दोन भावांनी एकमताने सदगुरू बाळोजीनाथ यांना गुरूदक्षीणा म्हणून सन १७८८ क्षयनाम संवत्सरी रोजी जमिनीवर उदक सोडत जमिन सदगुरूंना अर्पण केली. त्यानंतर त्या जमिनीवर मंदिर उभारण्यात आल. मंदिरातील श्री दत्तमुर्ती सदगुरू बाळोजीनाथांनी काश्मिरी सफेद पाषाणाची त्रिगुणात्मक श्री दत्तात्रयांची मुर्ती मुंबई कुभांरवाडा येथून एका व्यापा-याकडून यथाशक्तीने विकत घेवून शके १७८८ फाल्गुन शु. नवमीला मंदिरामध्ये विधीवत प्राणप्रतिष्ठापना केली. श्री दत्तमंदिर पालशेत या जागृत देवस्थानाचे जवळजवळ २३६ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास व परंपरा असलेल्या या देवस्थानाचा कारभार कसा चालवावा यासाठी एक लेखी पत्र सदगुरू बाळोजीनाथांनी शालीवाहन शके १७९६ भाद्रपद शुक्ल एकादशी सोमवार दिनांक १ रोजी करून ठेवले आहे. बेंडू नाना नार्वेकर खोत यांची इच्छा दत्तात्रयांच्या स्थापन केल्या आहेत. सन १९२२ मध्ये पालशेत गावावर प्लेग, कॉलरा या नैसर्गिक अपत्तीचे महाभयंकर संकट आल्याने पंचक्रोशीतील गावक-यांनी श्री दत्त महाराजांना प्लेग, कॉलरा या भयंकर साथीच्या आजाराचे निवारण करण्यासाठी साकडे घातल्याने या साथीच्या आजाराचे निवारण झाल्यामुळे ग्रामस्थांनी सन १९२२ साली नाम सप्ताह सूरू केला. या नामसप्ताहास १०२ वर्ष पूर्ण झाली असून हि प्रथा अजूनही चालू आहे. त्याचबरोबर सदगुरू बाळोजीनाथ यांनी दर गुरूवारी गावातून श्रींची वारी काढण्याची परंपरा सूरू केली.
रत्नागिरी जिल्हयातील अनेक मंदिरात मार्गशीर्ष महीन्यात दत्तजयंती उत्सव दिमाखात साजरे होत असतात. मात्र या मंदिराचे उत्सवाची सूरूवातीला मंदिरातील पुजारी व ग्रामस्थ मिळून गावामध्ये दत्त नामस्मरण करत भिक्षा मागतात. त्यानंतरमार्गशीर्ष शु. अष्टमी ते मार्गशीर्ष पौर्णिमा या ८ दिवसांच्या काळात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. नामसप्ताहामध्ये विणा खांद्यावर घेवून दत्तनाम घेत नाम सप्ताह सुरू असतो. हा सोहळा साजरा करताना पालशेत गावातील प्रत्येक वाडीतील भाविक आपापल्या प्रहरानूसार दत्तनाम घेत दोन तास नामस्मरण करतात. सर्व ग्रामस्थ मंडळी या उत्सवांमध्ये आपापली भजने मोठ़या भक्तिभावाने व तन्मयतेने सादर करून उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात. त्यानंतर दूस-या दिवशी सकाळी महाप्रसादाचा भंडारा करत रात्रौ श्रीदत्तात्रयांची मुर्ती पालखीत बसपून दत्त मानाच्या जयघोशात रथवारी काढली जाते. उत्सवातील आबालवृध्दांच्या आकर्षणाचा भाग म्हणजे या निमित्ताने येथे भरणारी जत्रा होय. ही जत्रा म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीय असते. तसेच या उत्सव काळात गावामध्ये मांसाहार केला जात नाही. त्याचप्रमाणे गावातील लोक अपेयपानही कटाक्षाने टाळतात. या मंदिराचे आणखी एक वैशिष्टय म्हणजे या मंदिरामध्ये एकाच वेळी श्री गणपती, श्री देवी रेणुका माता त्रिपुरारीका माता, संजीवनी समाधीस्त सदगुरू श्री बाळोजीनाथांची मूर्ती, श्री हनूमान सर्व देवतांचीही मंदिरे असल्याने भावीकांना सर्व देवतांचे एकाच ठिकाणी दर्शन घेण्याचे भाग्य भाविकांना लाभते.
नाम जपे वाचा नित्य श्वासातही नाम, नाममय होय देवा माझे नित्य कर्म….
॥अवधुतचिंतन श्री गुरुदेव दत्त॥