सोलापूर प्रतिनिधी : मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञातांनी दगडफेक केली आहे. सोलापूरमध्ये ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील जेऊरजवळ वंदे भारत ट्रेनवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे. दगडफेकीमुळे वंदे भारत एक्सप्रेसच्या सी-११ डब्ब्याची काच फुटली आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला इजा झालेली नाही. मात्र ही दगडफेक कोणी आणि का केली याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही. रेल्वे अधिकारी, आणि स्थानिक पोलिसांकडू या हल्लयाचा तपास सुरू करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या वंदे भारत सुपरफास्ट एक्स्प्रेसवर गुरुवारी (दि.२) रोजी रात्री ९.२० वाजता जेऊर कुईवाडी सेक्शनमधील भाळवणी स्थानकाजवळ अज्ञात व्यक्तिंकडून दगडफेक करण्यात आली. स्थानिक पोलीस आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यासंदर्भातील तपास केला जाणार असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आतापर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये अशाप्रकारे वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र आता महाराष्ट्रामध्येही अशी दगडफेक करण्यात आल्याने खरोखरच या बाबतीतही महाराष्ट्राचा युपी, बिहार झालाय का असा प्रश्न विचारला जातोय. अचानकपणे वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने काही काळ प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. कोणीतरी हुल्लडबाजी करत, कोणी गर्दुल्ल्याने दगडफेक केली का? की अन्य कोणते कारण आहे याचा शोध आता रेल्वे पोलिसांकडून घेतला जात आहे.