रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात परप्रांतीयांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात बांगला देशी घुसखोरांनाचा देखील सहबग आहे. काही दिवसांपूर्वी रत्नागिरीत चिरेखाणीवर अवैधरीत्या वास्तव्य करत असलेल्या १३ बांगला देशी घुसखोरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी बांगला देशींना हद्दपार करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवलेला आहे.
अशा प्रकारे घुसखोरी केलेल्या अन्य बांगला देशींविरोधात पोलिस विभागाने स्वतंत्र मोहीम उघडली असून, त्यासाठी पथक तयार करुन जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकण्यात येणार आहेत. नाखरे येथील चिरेखाण मालक आसिफ सावकार (रा.पावस,रत्नागिरी) याने एजंटद्वारेच या १३ बांग्लादेशी कामगारांना बोलावून चिरेखाणीवर ठेवल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या चिरेखाण मालकाचा या गुन्ह्यात सहभाग दिसून आला तर त्याला आणि ज्या एजंटने या कामगारांना इथे आणले त्याला आरापी करून त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षकांनी दिली.
दरम्यान, हे १३ बांग्लादेशी घुसखोर सध्या न्यायालयीन कोठडीत असून, जून २०२४ पासून अद्यापपर्यंत अवैध कागदपत्रांशिवाय तसेच भारत-बांग्लादेश सीमेवरील मुलखी अधिकार्याच्या लेखी परवानगीशिवाय भारतात अवैधरित्या प्रवेश करुन नाखरे ग्रामपंचायती हद्दीतील कालरकोंडवाडी येथील चिरेखाणीवर वास्तव्य करताना मिळून आले होते. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, स्वतंत्र मोहीम उघडली आहे. ज्या ठिकाणी अशाप्रकारे अवैधरीत्या बांगला देशी घुसखोरांना कोणी कामावर ठेवले असेल तर त्यांच्यावर देखील कडक अशी कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे.