रत्नागिरी प्रतिनिधी : बांगलादेशी नागरिकाला स्थानिक जन्मदाखला दिल्याच्या कारणावरून रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके याला निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही कारवाई केली. बोगस व्यक्तीला दाखला देताना पद्धतही चुकीची वापरण्यात आली आहे. जन्माच्या ३० दिवसानंतर दाखला देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही.
एका बांगलादेशी नागरिकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असताना, त्याला शिरगाव ग्रामपंचायतीने जन्मदाखला दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ग्रामसेवकासह तत्कालीन सरपंच आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गटविकास अधिकारी जाधव यांना दिले होते.
चौकशी पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी पंचायत समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला. तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने दाखला दिल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला आहे. या अहवालावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी सावके याला निलंबित केले आहे.