वायरमन..!
किती सोप्प असतं ना
लाईट गेल्यावर शिव्याशाप देणं,
आत्ताच जायला हवी होती
नेमकी आताच कशी गेली?
वायरमनचा राग राग करून
अख्खं घर डोक्यावर घेणं..!
आपलं काय जातय?
तोंडाला आली म्हणून शिवी द्यायला,
वादळ असो,
विजांचा कडकडाट असो,
हिंमत लागते ओ
भर पावसात वायर हाती घ्यायला..!
एक फोन नाही उचलला,तर ठरवून मोकळे
हे वायरमन नुसते झोपा काढत असतात,
बोलण्याआधी विचार करा,
दुसरीकडे काहीतरी काम असेल,
अहो झोप तर सोडा,
रात्रीच्या जेवणाच्या वेळीसुद्धा ते घरी नसतात..!
तुमच्या घरी उजेड यावा म्हणून
ते लगबगीने पावसातून ओल्या पोलावर चढतात,
विचारा एकदा
त्यांच्या परिवाराला,
त्यांच्या आई – बापाला,
तुमच्या काळजात ठोके किती वेगाने पडतात..!
कवी : अंकुर कनगुटकर