Thursday, October 29, 2026
Homeरत्नागिरीगुहागरलोककलेच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती ; बळीवंश फाउंडेशन गुहागर यांचा स्पर्धा परीक्षा वाचनालयासाठी...

लोककलेच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती ; बळीवंश फाउंडेशन गुहागर यांचा स्पर्धा परीक्षा वाचनालयासाठी अनोखा उपक्रम

गुहागर [सुशील आग्रे ] : ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्पर्धा परी क्षा क्षेत्रात भरारी घेता यावी आणि त्यांच्या अभ्यासाला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने ‘बळीवंश फाउंडेशन, गुहागर’ या सामाजिक संस्थेने एक स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे. गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी युक्त अशा स्पर्धा परीक्षा वाचनालयाची उभारणी संस्थेच्या वतीने केली असून, या वाचनालयाच्या आर्थिक निधी संकलनासाठी एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

‘बळीवंश कलामंच’ प्रस्तुत कोकणची सुप्रसिद्ध लोककला ‘बहुरंगी नमन’ आणि ‘अचाट नगरचा विवाह सोहळा’ हे धम्माल विनोदी लोकनाट्य या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. हा विशेष निधी संकलन सोहळा रविवार,दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ठीक १०:०० वाजता मुंबईतील चर्नी रोड येथील ‘मराठी साहित्य संघ नाट्यगृह’ येथे पार पडणार आहे.
ग्रामीण भागातील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रशासकीय सेवेत जाण्याची क्षमता आणि जिद्द असते; मात्र योग्य मार्गदर्शनाचा अभाव, स्पर्धा परीक्षांविषयी पुरेशी माहिती नसणे आणि अभ्यासासाठी आवश्यक सुविधांची कमतरता यामुळे अनेक विद्यार्थी या क्षेत्राकडे वळतच नाहीत, तर काहींना मार्गदर्शनासाठी शहरांचा आधार घ्यावा लागतो. गुहागर तालुक्यातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज भासू नये, तसेच त्यांच्या प्रशासकीय सेवेत जाण्याच्या स्वप्नांना आपल्या मातीतच बळ मिळावे, या उदात्त हेतूने बळीवंश फाउंडेशनने स्पर्धा परीक्षा वाचनालय उभारणीचा महत्त्वाकांक्षी संकल्प हाती घेतला आहे. हा संकल्प प्रत्यक्षात उतरवण्यासाठी संस्था नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जात असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या नव्या संधी निर्माण करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरत आहे. हीच अडचण ओळखून बळीवंश फाउंडेशनने वाचनालय उभारणीचा संकल्प धरला असून या कार्यक्रमाच्या प्रवेशिकांच्या (तिकीट) विक्रीतून जमा होणारा संपूर्ण निधी थेट या वाचनालयाच्या उभारणीसाठी आणि पुस्तकांच्या खरेदीसाठी वापरला जाणार आहे.
या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे यात नमन परंपरेतील भक्तिमय गण आणि शृंगाराने नटलेली नटखट गवळण पाहायला मिळणार आहे. यासोबतच शिवश्री सागर बबन डावल लिखित व दिग्दर्शित ‘अचाट नगरचा विवाह सोहळा’ हे विनोदी लोकनाट्य प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान ‘सम्राट बळीराजांना मानवंदना’ हा विशेष सोहळाही संपन्न होणार आहे.
नाट्यरसिकांनी व चाकरमान्यांनी या नाटकाची प्रवेशिका खरेदी करून, एका ग्रामीण विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन संस्थेने केले आहे. आपले छोटेसे तिकीट योगदान एका विद्यार्थ्याचे मोठे स्वप्न पूर्ण करू शकते, त्यामुळे या सामाजिक व शैक्षणिक कार्यात मुंबईतील कोकणवासीयांनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे, अशी विनंती बळीवंश फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रवेशिका व अधिक माहितीसाठी संपर्क:
सागर डावल (9594067223), विक्रांत चोगले (7066807812), हरिकेश बेद्रे (8975993485), दिपेश ठोंबरे (9404333622), रूपेश चोगले (9619234265).

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!